दररोज कोर्टाच्या त्या निर्जीव आणि थंड आवारात जेव्हा मी अनेक जोडप्यांना एकमेकांसमोर उभे राहिलेले पाहतो, तेव्हा काळजात कुठेतरी एक तीव्र कळ उमटते. कालपर्यंत ज्या हातांनी एकमेकांना जन्मभराची सोबत देण्याची शपथ घेतली होती, तेच हात आज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे चिखलफेक करत असतात. खरं तर, त्यांच्यामधील वाद हे सहजासहजी मिटण्यासारखे, बसून बोलण्यासारखे असतात. पण नात्याच्या मधोमध उभा राहिलेला विखारी 'अहंकार' आणि मनातील 'गैरसमज' त्यांना ती जवळीक साधूच देत नाही. "मी कशी बरोबर" आणि "सामोरचा कसा चुकीचा" हे सिद्ध करण्याच्या वेड्या शर्यतीत दोघेही स्वतःला विसरून जातात. पण या सगळ्यात, कोर्टाच्या त्या कटू वातावरणात सिद्धता करता करता, ते एकमेकांच्या नजरेत किती वाईट आणि परके होत चालले आहेत, याचं भानही त्या दोघांना उरत नाही.
संसार म्हणजे दोन जिवांनी मिळून विणलेली एक नाजूक आणि सुंदर वीण असते. पण दुर्दैवाने, आज अनेक घरांमध्ये स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहण्याऐवजी, त्रयस्थ लोकांचे ऐकून स्वतःच्याच हसत्या-खेळत्या स्वर्गामध्ये विष कालवले जाते. अनेकदा ही नात्याची दोरी एका बाजूने जास्त ताणली गेलेली दिसते. लहानशा गोष्टींवर देखील प्रमाणाबाहेर अति-प्रतिसाद (Overreact) देऊन सासरच्या माणसांशी हक्काचे नाते कायमचे तोडले जाते. नवरा - बायको हे एकमेकांच्या प्रेमाच्या किंवा हक्काच्या दोन शब्दांनाही चुकीच्या तराजूत तोलून, मनात तिरस्काराची आणि कटुतेची भिंत उभी करतात. जेव्हा या अविश्वासाची आणि गैरसमजाची आग घरभर पसरते, तेव्हा त्या घरात राहणाऱ्या नवऱ्याच्या संयमाचा अंत होतो. एका निष्पाप नात्याचा श्वास कोंडतो आणि वाद टोकाचे रूप धारण करून संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतात.
आजच्या या धावपळीच्या युगात फक्त मुला-मुलींचा अहंकारच कारणीभूत नाही, तर दोघांचे आई-वडील यांचा संसारातील अति-हस्तक्षेप हा देखील एका सुखी कुटुंबाचा गळा घोटताना दिसत आहे. आपल्या मुलाला किंवा मुलीला स्वतःचे निर्णय घेण्याइतपत समजूतदार न मानता, पालकांनी त्यांच्या छोट्या-छोट्या रुसव्या-फुगव्यात उडी घेणे हे त्यांच्या नात्याला अधिकच खिळखिळे बनवते. हे जगाला मान्य आहे की, एक मुलगी आपले आई-वडील, तिचे हक्काचे बालपण आणि जुने घर सोडून एका अनोळखी जगात, नवीन घरात प्रवेश करते. तिच्या मनातील ती भीती, ती घालमेल खूप मोठी असते. परंतु, त्या नवीन घराला आपलेसे करून तिथं आदराचे आणि प्रेमाचे 'अस्तित्व' निर्माण करण्याचे सामर्थ्य देखील त्याच मुलीच्या मनात आणि हातात असते. जर तिने समोरची व्यक्ती तिच्या जागी कदाचित बरोबर असू शकते, हा थोडासा समजूतदारपणा दाखवला, तर एकाही नात्याचा अंत कोर्टाच्या उंबरठ्यावर होणार नाही.
न्यायालयाच्या चौकटीत जेव्हा ही रडवेली आणि रागावलेली जोडपी येतात, तेव्हा कायदा चालवण्याआधी एक माणूस म्हणून आमचे हृदय हेलावते. 'मेडिएशन' (समुपदेशन) च्या माध्यमातून आम्ही त्यांच्यातील तुटलेला संवाद आणि हरवलेले प्रेम पुन्हा शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण जेव्हा नात्यापेक्षा अहंकार मोठा होतो, तेव्हा डोळ्यांत आसवे घेऊन आम्हाला केवळ कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या कराव्या लागतात. एक सुंदर आणि समृद्ध संसार उभा करायला संपूर्ण आयुष्य वेचावे लागते, पण अहंकाराच्या एका क्षणात तो राख व्हायला दोन मिनिटेही पुरत नाहीत. म्हणूनच, आपल्या हक्काच्या माणसांची आणि संसाराची काळजी घ्या.
बाहेरील जगाने काहीही सांगितले तरी, ज्याच्याशी डोळे मिळवून आयुष्य काढायचे आहे, त्या जोडीदाराच्या प्रेमावर आणि निष्ठेवर जगापेक्षा जास्त विश्वास ठेवा. जोडीदाराच्या आई-वडिलांना आणि परिस्थितीला समजून घ्या. तुमच्या मायेनेच ते घर तुमचे हक्काचे घर बनेल. नात्यामध्ये झुकणे म्हणजे पराभव नव्हे, तर समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात दिलेले सर्वोच्च स्थान असते. कधीकधी थोडीशी तडजोड संसार सोन्याचा करते.
लक्षात ठेवा, एकदा हातांमधून निसटून गेलेली वेळ आणि तुटलेली हक्काची माणसे जगात कोणतीही संपत्ती देऊन पुन्हा मिळवता येत नाहीत. विखुरलेली मनं पुन्हा कधीच सांधली जात नाहीत. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत नात्यांना, भावनांना आणि माणसांना मनापासून किंमत द्या. माणसांना जोडून ठेवण्यात आणि नाती जिवंत ठेवण्यातच मानवी जन्माचे खरे भाग्य दडलेले आहे!
लेखक - सुमित योजना अशोक वाघमारे, इंदापूर.
0 Comments