ticker

6/recent/ticker-posts

आई, माझ्या पाठीवरचे हे वळ देशाच्या भविष्याचे आहेत का?

रात्रंदिवस एका छोट्याशा खोलीत, अंधुक प्रकाशात, डोळ्यांत हजारो स्वप्ने घेऊन पुस्तकांवर मान टाकणारा एक तरुण जेव्हा रस्त्यावर उतरतो, तेव्हा तो स्वतःसाठी नाही, तर आपल्या आई-वडिलांच्या घामाच्या थेंबासाठी लढत असतो. दिल्लीचे जंतर-मंतर सध्या अशाच लाखो मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या हुंदक्यांनी आणि आक्रोशाने हादरून गेले आहे. स्पर्धा परीक्षांमधील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या चक्रव्यूहात अडकलेले हे विद्यार्थी आज आपले भविष्य वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण, दुर्दैवाने ज्या हातांना पुस्तकांचा आधार द्यायला हवा होता, त्या हातांवर आज प्रशासनाने लाठ्यांचे निर्दयी वळ उमटवले आहेत.

या आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी एका अशा पाश्वभूमीतून येतो, जिथे वडिलांनी शेत गहाण ठेवले आहे किंवा आईने आपले दागिने विकून मुलाला शहरात अभ्यासासाठी पाठवले आहे. "माझा मुलगा मोठा साहेब होईल, आमचे दारिद्र्य संपवेल," ही एकच आस त्या माऊलीच्या डोळ्यांत असते. वर्षानुवर्षे चटणी-भाकर खाऊन, सणासुदीला घरी न जाता, केवळ अभ्यासाचा ध्यास घेणाऱ्या या मुलांच्या नशिबी जेव्हा एका क्षणात 'पेपर फुटला' ही बातमी येते, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. भ्रष्टाचारामुळे जेव्हा एका पैशावाल्याची अकार्यक्षम मुले पुढे जातात आणि गुणवान विद्यार्थी मागे पडतात, तेव्हा त्या मुलाच्या आत्मसन्मानाचा खून होतो. याच वेदनेतून, याच अन्यायाविरुद्ध एकत्र येत तरुणांनी स्वतःला उपहासाने 'कोकरोच जनता पार्टी' म्हणून संघटित केले—कारण व्यवस्थेने त्यांना केवळ चिरडण्याजोगा कीटक समजले होते.

जंतर-मंतरवर शांततेने, हातात तिरंगा आणि संविधानाची प्रत घेऊन बसलेल्या या निशस्त्र विद्यार्थ्यांवर जेव्हा लाठीचार्ज झाला, तेव्हा तो केवळ त्यांच्या शरीरावर झालेला प्रहार नव्हता. तो प्रहार होता एका बापाच्या विश्वासावर, एका आईच्या आशेवर. पोलिसांची लाठी जेव्हा एका तरुण मुलीच्या किंवा मुलाच्या पाठीवर बसत होती, तेव्हा दिल्लीपासून हजारो मैल दूर असलेल्या त्यांच्या गावाकडच्या घरातल्या आईचे काळीज हेलावत होते.

"ज्या देशात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे संवादाने दिली जात नाहीत, तर त्यांच्या रक्ताने दिली जातात, तिथली व्यवस्था आतून पूर्णपणे सडलेली असते."

रक्तबंबाळ झालेले चेहरे, फाटलेले कपडे आणि डोळ्यांतील अश्रू लपवत संसदेकडे पाहणारे हे विद्यार्थी आज देशाला प्रश्न विचारत आहेत की, "आमचा गुन्हा काय? फक्त एवढाच की आम्ही गरिबाच्या घरात जन्मून मोठी स्वप्ने पाहिली?"

'कोकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली एकत्र आलेले हे तरुण आज केवळ परीक्षा रद्द करण्याची मागणी करत नाहीयेत. हा लढा आहे त्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या स्वाभिमानाचा. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीने कित्येक तरुणांना आत्महत्येच्या दारात ढकलले आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांमधील भ्रष्टाचाराने विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण केले आहे. आज हे विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि संपूर्ण यंत्रणेच्या शुद्धीकरणाची मागणी करत आहेत, जेणेकरून भविष्यात कोणत्याही आईच्या पदरात तिच्या मुलाचे प्रेत पडणार नाही.

तरुणाईच्या डोळ्यांतील अश्रू हे कोणत्याही जिवंत लोकशाहीसाठी सर्वात मोठे अपयश आहे. जंतर-मंतरवरील या विद्यार्थ्यांच्या जखमा काळानुरूप भरतीलही, पण त्यांच्या मनावर व्यवस्थेने दिलेले हे घाव कधीच भरणार नाहीत. जर आज आपण या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही, तर उद्या आपल्या देशाचे भविष्य अंधकारमय होईल. प्रशासनाने हे समजून घेतले पाहिजे की, लाठ्यांनी शरीरे वाकवता येतात, पण हक्कासाठी लढणारा तरुणांचा बाणा कधीच मोडता येत नाही. आज गरज आहे ती या पोरांना छातीशी कवटाळून त्यांना न्याय देण्याची, कारण जर देशाचा तरुण हरला, तर अख्खा देश हरेल.
शेवटी या... आंदोलनाला यश आले आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला.

लेखक - सुमित योजना अशोक वाघमारे, इंदापूर.

Post a Comment

1 Comments