कौटुंबिक आणि राजकीय वारसा लाभूनही दादांनी स्वतःचं एक वेगळं आणि स्वतंत्र स्थान निर्माण केलं. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नेहमीच 'कामाचा माणूस' म्हणून पाहिलं. दादांच्या स्वभावात एक वेगळाच दरारा आहे. समोर कोण आहे याचा विचार न करता जे पटतं ते स्पष्ट बोलणं, आणि जे पटत नाही त्याला जाहीर नकार देणं, हा त्यांचा बाणा आहे. आजच्या राजकारणात जिथे गोड बोलून कामं लांबवण्याची पद्धत आहे, तिथे दादांचं "होय तर होय, नाही तर नाही" हे वाक्य कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला एक वेगळाच दिलासा देऊन जातं.
पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. जानेवारी २०२६ च्या त्या काळ्या दिवशी बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने सबंध महाराष्ट्राला सुन्न केलं. ज्या बारामतीवर दादांनी जीवापाड प्रेम केलं, त्याच बारामतीच्या मातीत दादांच्या आयुष्याचा प्रवास अचानक थांबला. ती बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली, तेव्हा केवळ त्यांचे कुटुंबीय आणि राजकीय नेतेच नाही, तर महाराष्ट्रातील हजारो शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनता ढसाढसा रडली. पहाटे पाच वाजता उठून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला पळवणारा तो खंबीर आवाज कायमचा शांत झाला होता. दादांचे जाणे ही केवळ एका मोठ्या नेत्याची एक्झिट नव्हती, तर लाखो कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचे हक्काचे छत्र हरपण्यासारखे होते. हा आघात इतका मोठा होता की, आजही महाराष्ट्राच्या मातीला दादांची उणीव प्रत्येक क्षणाला भासत आहे.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक चढ-उतार पाहिले. अनेक वादळं आली, अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. या सगळ्या गदारोळात दादांनी घेतलेले काही राजकीय निर्णय चर्चेचा विषय ठरले. पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही—ती म्हणजे दादांची कामाची पद्धत आणि त्यांची जनतेशी असलेली कटिबद्धता. अनेकदा मनातली वेदना, होणारी घालमेल आणि राजकीय कोंडी ते चेहऱ्यावर दाखवत नाहीत. पण त्यांच्या बोलण्यातून, कधीकधी त्यांच्या डोळ्यांतून ती अस्वस्थता स्पष्ट जाणवायची. शेवटी, नेता असला तरी तोही रक्तामांसाचा माणूसच असतो. नात्यांमधील गुंफण, पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि जनतेच्या अपेक्षा यांच्या कात्रीत अडकल्यावर होणाऱ्या वेदना दादांनी नेहमीच संयमाने पचवल्या आहेत.
दादांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली जोडलेली नाळ. मंत्रालयात किंवा त्यांच्या दौऱ्यात जेव्हा एखादा गरीब शेतकरी, कष्टकरी माणूस आपली कैफियत घेऊन यायचा, तेव्हा दादा त्याची फाईल बाजूला ठेवत नसत. ते तिथेच अधिकाऱ्यांना फोन लावून काम मार्गी लावायचे. ही जी कामाची 'अजितशाही' होती, तीच लोकांच्या मनाला भिडायची.
अजितदादा पवार हे केवळ एक नाव नाही, तर ती एक कार्यपद्धती आहे. चुकणाऱ्याला जाहीरपणे कानपिचक्या देणारा हा नेता, काम करणाऱ्याच्या पाठीवर तितक्याच हक्काने कौतुकाची थापही द्यायचा. आज दादा आपल्यात नसले, तरी त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा कोरलेला मार्ग आणि त्यांची प्रशासकीय शिस्त सदैव आठवणीत राहील. वादळं कितीही आली आणि राजकीय समीकरणं कितीही बदलली, तरी जनतेच्या सुख-दुःखात स्वतःला झोकून देणारा हा 'सकळ जनप्रिय' दादा महाराष्ट्राच्या इतिहासात नेहमीच अजरामर राहील!
लेखक - सुमित वाघमारे, इंदापूर.
0 Comments