ticker

6/recent/ticker-posts

एका अक्षराचा महामेरू: साताऱ्याची शाळा ते जगाची राज्यघटना

७ नोव्हेंबर १९०० चा तो शांत, अल्हाददायक दिवस भारतीय इतिहासाच्या गर्भात एक मूक क्रांती घडवून आणत होता. साताऱ्यातील शासकीय हायस्कूलच्या प्रांगणात जेव्हा एका सहा वर्षांच्या बालकाने आपले छोटे पाऊल ठेवले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही याची पुसटशी कल्पना नव्हती की हे पाऊल पुढे जाऊन कोट्यवधी माणसांच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून टाकणार आहे. तो निरागस, तेजस्वी डोळ्यांचा बालक म्हणजे सर्वांचे लाडके भिवा, म्हणजेच आपले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. सुभेदार रामजी सपकाळ हे सेवानिवृत्तीनंतर आपल्या कुटुंबासह साताऱ्यातील लष्करी भागात राहत होते. आपल्या मुलाने शिकावे, मोठे व्हावे या एकाच ध्यासाने प्रेरित होऊन त्यांनी भिवाला शिक्षणाच्या मंदिरात आणले. त्या काळी शिक्षणाची दारे सर्वांसाठी इतकी सहजासहजी उघडी नव्हती. विषमतेच्या आणि अन्यायाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजातून एक कोवळा जीव ज्ञानाची ज्योत हाती घेण्यासाठी त्या शाळेच्या पायऱ्या चढत होता.
शाळेत प्रवेश करताना मूळ गाव आंबावडे असल्यामुळे वडिलांनी नोंदवहीत 'आंबडवेकर' असे आडनाव नोंदवले. वर्गामध्ये बसताना मिळणारी हीन वागणूक, पाण्यासाठी करावी लागणारी वणवण आणि केवळ जन्मावरून वाट्याला येणारा तिरस्कार या बालमनावर खोल जखमा करत होता. तरीही शिक्षणाची ती तहान इतकी अथांग होती की बाह्य जगातील कोणतेही दुःख भिवाच्या डोळ्यांतील ज्ञानाची चमक हिरावून घेऊ शकले नाही. याच शाळेत त्यांना लाभले कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे एक प्रेमळ शिक्षक. त्यांनी जातीच्या आणि भेदाभेदाच्या भिंती ओलांडून त्या तेजस्वी बालकातील अद्वितीय प्रतिभा ओळखली. एका गुरुने आपल्या शिष्यावर जीवापाड प्रेम करत आपले स्वतःचे 'आंबेडकर' हे आडनाव त्या बालकाला अर्पण केले. हे केवळ आडनावाचे हस्तांतरण नव्हते, तर एका निष्ठावंत गुरुने आपल्या शिष्याला दिलेले आशीर्वादाचे कल्पतरू होते.
शाळेच्या जुन्या रजिस्टरमध्ये नोंदवली गेलेली 'भिवा रामजी आंबेडकर' ही अक्षरे म्हणजे एका नव्या युगाची, एका नव्या क्रांतीची जन्मनोंद होती. त्या जुन्या राजवाड्याच्या वास्तूत, खडतर परिस्थितीचा सामना करत बाबासाहेबांनी इंग्रजी चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्या वर्गातील बाक, त्या भिंती आणि ते प्रांगण मूक साक्षीदार होते त्या संघर्षाचे, ज्या संघर्षातून पुढे जाऊन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची अभेद्य राज्यघटना जन्माला येणार होती. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा जगाला आत्मविश्वास देणारा मंत्र याच साताऱ्याच्या भूमीवर आकाराला येत होता. एका लहान बालकाने विषमतेच्या काट्यांवरून अनवाणी चालत सुरू केलेला हा प्रवास पुढे चालून संपूर्ण विश्वाला समता, बंधुता आणि न्यायाचा प्रकाश दाखवणारा ठरला.
आज ती शाळा छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल म्हणून दिमाखात उभी आहे आणि राज्य सरकारने २०१७ पासून ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या शाळाप्रवेशाची आठवण नाही, तर ज्ञानाच्या सामर्थ्याचा उत्सव आहे. परंतु आजच्या काळात केवळ एका दिवसाचा उत्सव साजरा करून आपले ऋण फेडता येणार नाही. ज्या वास्तूत बाबासाहेबांचे बालपण व्यतीत झाले, ज्या आमने बंगल्यात त्यांनी संघर्षमय क्षण अनुभवले, त्या परिसराचे भव्य स्मारक उभे राहणे ही काळाची गरज आहे. ज्या शाळेत ज्ञानाचा सूर्य उगवला, त्या शाळेला एका जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय विद्यालयात रूपांतरित केले पाहिजे, जिथे जगभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना विषमतेवर मात करून शिखर गाठण्याची प्रेरणा मिळेल. ती पवित्र शाळा ज्ञानाचे जागतिक तीर्थक्षेत्र बनावी, आणि प्रत्येक विद्यार्थ्याने तिथे नतमस्तक होऊन शिक्षणाची खरी किंमत जाणून घ्यावी, हीच त्या युगपुरुषाला वाहिलेली अंतःकरणापासूनची खरी आदरांजली ठरेल.

लेखक : सुमित योजना अशोक वाघमारे, इंदापूर.

Post a Comment

1 Comments